एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची
एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची
नमस्कार मंडळी,
तांदूळवाडी गड हा तसा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा, मुंबई जवळ, अगदी हाकेच्या अंतरावरच आहे तो, कमी खर्चिक बाब असा अगदी 100 रुपयात आपला प्रवास खर्च भागून जातो.
सकाळच्या 5.45 आणि 6 अशा लागोपाठ दोन लोकल गाड्या डहाणू कडे जातात, ज्या सफाळ्याला 7 वाजता पोहोचतात. सफाळा स्टेशन बाहेर पूर्वेकडे एसटी बस उभीच असते, एसटी आपल्याला 20 रुपयात हिरव्यागार छोट्याश्या घाटाची सफर घडऊन थेट गडाच्या पायथ्याशी सोडते.
घाटातून गड दिसतो पण तो धुक्यात माखलेल्या अवस्थेत असतो. एक अद्भुत असा नजारा प्रवास करताना दिसतो.
तांदूळवाडी स्टॉप वर उतरल्यावर प्रशस्त असा वाहनतळ जिल्हा परिषदेने केला आहे, तिथे पार्किंग फुकट आहे मग चिंता नाही. पार्किंग समोरच काही दुकाने आहेत मग अगदी निर्धास्त पणे गाडी ठेऊन जाऊ शकता.
तांदूळवाडी गड तसा लहानच पण चहू बाजूने गर्द अशा सह्याद्रीतील झाडं झुडपांनी वेढलेला आहे. मुख्य गडावर जायला आपल्याला एक दोन छोटे डोंगर पार करावे लागतात.
गड परिसरात भरपूर तलाव, धरणे, गर्द झाडी, खाडी परिसर, खाजणाचा परिसर असे सगळे पक्षी आणि वन्य प्राण्यांना उपयुक्त असा पोशिंदा असल्यामुळे प्राणी आणि पक्षी मुबलक प्रमाणात दिसतात. जंगलात विविध प्रकारची वन्य जडिबुटीची आयुर्वेदिक झाडे मुबलक प्रमाणात आहेत.
आपण तांदूळवाडी शाळे शेजारून आपला प्रवास चालू केल्यावर वाटेत समोरच एक छोटेखानी पाझर तलाव आणि बांधारा दिसतो. पावसाच्या पाण्यामुळे पणी चहा सारखे गढूळ लाल झाले आहे. त्या लाल पाण्यात धुक्यात लपलेल्या तांदूळवाडी गडाची छबी आणि हिरवागार डोंगर अगदी मन मोहून घेतो.
पुढे थोडी कुडाची घरे लागतात आणि आपण गावा बाहेर पडतो ते थेट जंगलात शिरतो.
ही पायवाट फार छोटी आहे, अगदी एकच माणूस जाऊ शकतो एव्हढी लहान. वाटेत काट्या कुट्याची झाडे आहे तेव्हा इथून सांभाळून जा.
पुढे घनदाट जंगलाचा प्रवास चालू होतो, अगदी मधे मधे काळी कुट्ट अशी वेलींची अंधारी जाळी सदृश्य कमान भेटते.
आपला प्रवास असाच चालू राहतो, आपण असे एक दोन डोंगर पार केले की मुख्य पठारावर पोहोचतो. हा प्रवास ग्रूपने केलेलाच बरा, कारण इथे कोणीही माणसे, गावकरी, असे काही नाही फक्त गर्द अशी झाडी आहे, ढोर वाटा भरपूर आहेत त्यामुळे मन द्विधा मनस्थितीत जाते, हे साहजिकच आहे. पण थोडा धीर धरा जरा नीट सावधानतेने बघितले तर इथे ऑईल पेंट ने सफेद आणि पिवळ्या रंगाच्या मार्किंग केल्या आहेत, त्यांचा सहारा आहे.
मुख्य गडावर जाण्यासाठी इथे 3 मार्ग आहेत, 1) गडाच्या उत्तरेकडून 2) गडाच्या दक्षिणेकडून आणि 3) गडाच्या पूर्वेकडून
गडाच्या उत्तरेकडचा रस्ता हा फार सोपा आहे दगड धोंद्याच्या पायरीचा आहे पण लांबलचक आहे याची नोंद घ्यावी.
गडाच्या दक्षिणेकडचा जो रस्ता आहे तो अत्यंत कठीण आहे, उभा धोक आहे काही ठिकाणी कठीण निसरडा भाग पण आहे.
गडाच्या पूर्व दिशेला जो रस्ता आहे तो एका घळीतून जातो आणि सगळ्यात सुंदर आहे, गडावरून लहान मोठे ओहळ वाहत येत असतात, निसर्गाचे निखळ रूप इथे बघायला मिळते.
आम्ही हा तिसरा पूर्व दिशेचा मार्ग निवडला आणि अद्भुत असे असंख्य छोटे मोठे असे धबधबे बघायला मिळाले पण हा दगड मातीचा अंगावर येणारा चढ आहे.
बहुदा ट्रेकर मंडळी दक्षिणेच्या बाजूने वर चढतात आणि उत्तर बाजूने खाली उतरतात.
गडावर पोहोचलो तेव्हा मोजकीच मंडळी तिथे होती, ढग सर्वत्र पहुडलेले दिसले. वारा पण बेफाम होता, अधून मधून ढग हाताला लागून जात होते, हे निसर्गाचे सुख फक्त सह्याद्रीतच बघायला मिळते.
गडावर 25 पाण्याच्या टाक्या आहेत, त्यातल्या थोड्या आम्ही बघितल्या, एक भग्न अवस्थेतील मंदिर दिसले, एक विशेष बाब जी मला नोंदवाविशी वाटते की या पालघर जिल्ह्यात कुठेही जांभा दगड दिसत नाही, पण या गडावर जांभा दगड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, हे सगळे बघून आम्ही उत्तरेच्या मार्गाने परतीचा प्रवास केला.
उतरताना आम्ही गडाखाली असलेल्या तांदूळवाडी धबधब्याला पण भेट दिली, त्याबद्दल पुढील भागात बघू.
गड फार उंच नाही, गड दोन ते तीन डोंगरावर पसरलेला आहे. त्यामुळे 1 तास पुरे संपूर्ण गड बघुन घ्यायला.
आम्ही हा ट्रेक TTMM तत्त्वावर केला होता, आम्हाला माणशी फक्त 90 रुपये खर्च झाला. नाश्ता आणि जेवण आमचे बरोबर घेतले होते.
आपल्याला आमच्या ट्रेक सफरिमध्ये सहभागी व्हायचे असेल तर खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/COawAF4287QA9KAvzJSEFI
आमचा स्वर्गरुपी अनुभव जर आपल्याला खरंच बघायाचा तर तो व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहे, खालील लिंक क्लिक करून आस्वाद घ्यावा.
https://youtu.be/zXDjR14RcdU?si=3JmqxX2QSZivvAAm
आमच्या चॅनलच्या फिरस्तीच्या नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L
आपलाच
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
Borivali Hikers
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा