One Day Picnic Spot Near Mumbai, श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान, बारवी धरण बर्ड व्ह्यू पॉइंट
नमस्कार मंडळी🙏
यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट
मंडळी आजची (२२ जानेवारी) फिरस्ती जरा वेगळीच होती, कारण होते आरवचा वाढदिवस. नेहमी मॉल मध्ये, गडावर जाऊन मुलांना त्याचा कंटाळा येतो, म्हणुच आपण वेगवेगळे रविवार वेगवेगळ्या ठिकाणी साजरे करतो.
आज आम्ही ठरवले की आपल्या आरावचा वाढदिवस हा अखंड महाराष्ट्राचे दैवत अशा खंडोबाच्या मंदिरात मूळगावी जाऊन आशीर्वाद घ्यायचा आणि निसर्गाच्या सानिध्यात साजरा करायचा.
सकाळी लवकर उठून तयारी केली आणि बोरिवली वरून ७.३० वाजता घर सोडले. प्रचंड थंडी होती त्यातच आम्ही बदलापूर ला जायचे ठरवले. गाडीत थंडीचा कडाका अजिबात कळात नव्हता. सकाळचे रम्य वातावरण आणि धुक्यात हरवलेले हिरवे डोंगर, त्यातच तुडुंब भरून वाहणाऱ्या बरवी नदीचे खोरे अधून मधून विलोभनीय दिसत होते होते.
आम्ही ९ वाजता श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान, मुळगाव इथे पोहोचलो. वाहन ठेवायला भरपूर जागा आहे त्यामुळे चिंता नव्हती. बरं इथे सार्वजनिक वाहनाने यायचे असेल तर बदलापूर स्थानक गाठा, पुढे रिक्षा उपलब्ध आहेत, बहुदा २०० रुपयांमध्ये आपण येऊ शकता, पण रिक्षा चालकास परत जाण्यासाठी इथेच थांबवा जाण्याचे वेगळे पैसे लागतील ते आधीच ठरवा, करणं परतीसाठी चांगले होईल.
मंदिर जवळ जवळ 300 वर्ष पूर्वीचे पेशवे कालीन आहे. या मंदिराची पूजा थेट 300 वर्षे चालत आली आहे आणि इथे जत्रा देखील तीनशे वर्षे भरत आली आहे. इथे मंदिराला 565 पायऱ्या आहेत, पण ह्या पायऱ्या आपल्या बिल्डिंगला असतात तशा नाहीत ह्या फार लांब लांब अशा पायऱ्या आहेत त्यामुळे मोजायला गेल्यास हजार पेक्षाही जास्त पायऱ्या आहेत त्याची नोंद घ्यावी. पार्किंग पासून दोन मिनिटांवर मंदिराच्या पायऱ्यांना सुरुवात होते. इथेच बाणाई मातेचे छोटेखानी मंदिर आहे. बाणाई मातेचे दर्शन घेतले तेव्हा तिथे एक इसम पूजा करत होता. ज्या प्रकारे तो पूजा करत होता ती काही वेगळीच प्रथा होती ती तरी मी स्वतः पहिल्यांदाच अनुभवली आणि त्याच्यामुळे मला त्याचं फार अवचित्य वाटलं. आमच्या संस्कृतीमध्ये भंडारा हा कधी उधळला जात नाही पण हे पहिल्यांदाच बघितलं की ह्या मंदिरात त्यांनी आम्ही आत मध्ये आल्या आल्या पूजा अर्चा करता क्षणी त्यांनी आम्हालाही भंडारा लावला आणि भंडाऱ्याची फुंकर दारावर हवेमध्ये मारली आता ह्याचा अर्थ काय झाला हे मलाही माहिती नाही पण त्यांनी ज्या अर्थे आम्हाला भंडारा लावला त्या अर्थी आम्हालाही चांगलं वाटलं आणि जे काही केलं ते चांगल्याच अर्थी केले असावे.
इथेच गावातली काही लहान मुलं आली होती रविवारचा दिवस म्हणून ते बहुदा मंदिरात आले असावेत त्यांनी देखील मंदिरात बाणाई देवीची पूजा केली आणि देवीची आरती गायली. विशेष म्हणजे त्या त्या मुलांनी पूजाअर्चा झाल्यानंतर बाणाई देवीला मुजरा केला. मुजरा करणे हा प्रकार देखील माझ्यासाठी नवखाच होता त्यामुळे नवीन काही बघितल्याचा आणि शिकल्याचा आनंद मिळाला.
चला दिवसाची सुरुवात छान झाली आता पुढे पायऱ्या चढायला सुरुवात करूया. खंडोबाचा डोंगर छोटासाच होता, पण त्याचा चढ हा खडा होता सुरुवातीच्या पायऱ्या सोडल्यानंतर खऱ्या खड्या चढाला सुरुवात होते. जस जसे वर चढत जातो, तस तसा आजूबाजूचा परिसर दिसायला लागतो, हा विभाग जंगल सदृश्य असल्यामुळे इथे विविध प्रकारची झाडे उपलब्ध आहेत. तसेच वर चढताना आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. बाजूलाच बारवी धरणाचं क्षेत्र असल्यामुळे त्याचा ह्या परिसराला भरपूर फायदा झाला आहे. इकडे जंगल संपदा भरपूर आहे त्याबरोबरच पशु पक्षी हेही भरपूर आहेत. गड चढताना आपल्याला जंगलातील पक्षांचा कीलबिलाट ऐकायला येतो. आतापर्यंत दिसणारे प्रसन्न वातावरण अधिकच आल्हादायिक वाटते कारण आजूबाजूचा देखावा हा जणूकाही एखाद्या चित्रकाराच्या कुंचलातून प्रतीत झाल्यासारखा भासतो. गडावर जातानाच पुढे घोड्याच्या पावलांचे ठसे उमटलेले आहेत तिथेही लोकांनी भंडाऱ्यांनी त्यांची पूजा केलेली दिसते. असे बोलले जाते की जेजुरीवरून दोन घोडे निघाले होते त्यातला एक घोडा मुळगाव या येथे थांबला हे ठसे त्याच घोड्याच्या पायाचे आहेत आणि देव डोंगराच्या वरती जाऊन वसले म्हणूनच या गावालाही मुळगाव असे बोलले जाते.
हे सगळं बघता बघता लगेचच आपण गडावर पोहोचतो. मंदिर हे छोटेखानीच आहे पण हे डोंगराच्या सर्वोच्च भागावर असल्यामुळे आजूबाजूचा नयनरम्य परिसर दिसतो थंडीचे दिवस असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर धुक्याची चादर पसरली होती, त्यामुळे समोरच असलेले चंदेरी, म्हैसमाळ, नखिंद, ताहुली ही माथेरानची डोंगररांग समोर असून सुद्धा दिसत नव्हती.
खंडोबाच्या मंदिरामध्ये आम्ही आल्यावरती काही मंडळी देवपूजा करत होती देवपूजा करण्याची विधी वेगळीच होती हा सगळा प्रकार आमच्यासाठी नवीनच होता. आपण आपल्या देवी देवतांची पूजा नारळ खण फुलं यांनी करतो परंतु खंडोबाची पूजा ही इथे भंडाऱ्याने केली जाते. खंडोबा आहे साक्षात शंकराचेच रूप असल्यामुळे दुधाचा अभिषेक घातला जातो. मंदिरामध्ये आणि मंदिराच्या परिसरामध्ये सगळ्या भंडाऱ्याची उधळण झालेली होती. मंदिरामध्ये स्वयंभू तीन पिंडी आहेत त्यामध्ये पहिली पिंडी खंडेरायाची दुसरी पिंडी म्हाळसाची आणि तिसरी पिंडी बानूची असे बोलले जाते. पिंडीच्या मागे खंडोबाची छोटे खानी मूर्ती आहे. असे बोलतात की जिथे ह्या पिंड्या आहेत तिथे भंडारा लोकांना वहायला लागत नाही, इथे भंडाऱ्याची निर्मिती सतत होत असते हा एक दैवी चमत्कार आहे. मंदिरात गर्दी नव्हती तरीही लोकांचा राबता सतत चालू होता आमचे दर्शन सुंदर झाले मन प्रसन्न झाले.
थोडा वेळ प्रसन्न वातावरणामध्ये मंदिराच्या आवारामध्ये बसलो क्षीण तसाही दूर झाला होता देव दर्शनामुळे. या आनंदी वातावरणामध्ये आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली.
गडाखाली आल्यावरती पार्किंग लॉट मधील सावलीमध्ये आम्ही आमचा नाश्ता केला. पुढे आम्हाला बारावी धरणाकडे जायचे होते. धरणाच्या बांधापर्यंत पोहोचलो पण तिथून पाऊस नसल्यामुळे पाणी वाहत नव्हते तरीही हायड्रो पॉवर प्लांट जिथे आहे तिथून पाण्याचा अखंड प्रवाह चालू होता. आम्ही गाडी लागलीच थांबवली आणि वाहता पाण्याचा आस्वाद घेतला. असे कळले की इथे बारमाही पाणी वाहते कारण बारावी धरणाचा पाण्याचा साठा उत्तम आहे आणि येथील एमआयडीसी परिसराला इथूनच विजेचा पुरवठा केला जातो. पाणी एकदम स्वच्छ शुद्ध अशा प्रकारचे होते. आजूबाजूला कमी लोकवस्ती आणि जास्त जंगलपट्टा असल्यामुळे पाण्याची शुद्धता समोरच दिसत होती. पाण्याची खळखळ भरपूर होती म्हणूनच ह्या जागेचा पिकनिक स्पॉट म्हणून वापर बाराही महिने केला जातो. आम्हाला ह्या जागेची खबर नव्हती जर आधी माहिती असतं तर इथेच विसावा घेतला असता आणि जास्तीचे कपडे आणून पाण्यामध्ये भिजण्याचा आनंदही लुटला असता, असो काही खेद नाही कारण की आम्हाला जिथे पुढे जायचं होतं तोही स्पॉट अतिशय सुंदर होता.
आम्ही पुढे निघालो बदलापूर मुरबाड रोडवरील बारवी धरणाचा बर्ड व्ह्यू पॉईंट या जागी आम्ही पोहोचलो. रस्ता अगदी छोटा असल्यामुळे आणि वरदळीचा असल्यामुळे गाडी पार्किंगला जागा फार कमी होती तरीही गाडी डांबरी रस्त्यावरून खाली उतरवली आणि सुरक्षित पार्क केली.
लागणारे सामान आम्ही आमच्याबरोबर घेतले कारण आम्हाला दुपारचे वनभोजन करायचे होते. हा परिसर जंगलचदृश्यच आहे आजूबाजूला अथांग बारावी धरणाचे पाणी त्यामुळे आजूबाजूला दाट जंगल वस्ती आहे त्याचमुळे त्याचाच परिणाम म्हणून इथे जंगली शपथ पशुपक्षी यांचा वावर भरपूर आहे. आपण पाच मिनिटांच्या आतच आत मध्ये बर्ड व्ह्यू पॉईंट पर्यंत पोहोचतो आत मध्ये येणारा रस्ता हा अतिशय सुंदर आणि वन्य वृक्षांनी बहरलेला आहे. आत येण्यासाठी मळलेलीच पायवाट आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही विचार करायची गरज नाही हे दोन्ही स्पॉट गुगल मॅप वर अंकित असल्यामुळे तुम्ही गुगल मॅपचा सहारा घेऊ शकता. पावसाळ्यामध्ये इथे भरपूर लोकांची रेलचेल असते त्यामुळे मला तरी वाटते की वन विभागाने इथे झाडाखाली भरपूर पार बनवलेले आहेत जेणेकरून पिकनिक साठी येणाऱ्या मंडळींना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल.
आता आम्ही जंगल चालून बारावी धरणाच्या परिसरात आलो इथे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत निळे क्षार स्वच्छ सुंदर पाणीच पाणी दिसत होते. आभाळ ही निळे होते पाणीही निळे होते आभाळाचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते त्यामुळे ह्या दोघांमध्ये अखंडता होती जणू काही मी एका काचेच्या पाण्याच्या टाकीमध्ये आलो आहे की काय अशी भावना झाली कारण पाण्याचा प्रचंड असा जलाशय वरती अखंड दिसणारे नितळ आभाळ ह्या दोघांचा रंग एकच होता. हे रूप आम्ही डोळ्यांमध्ये सामावून घेतले आणि पुढे दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी निघालो.
जवळच एका पाराखाली गर्द सावली होती म्हणून इथेच लवाजमा थांबवायचा असं ठरलं. सगळा जेवण बनवण्याचा सेटअप लावला आणि हाहा करता दुपारचे जेवणही तयार झाले. ह्या रम्य अशा वातावरणामध्ये गरम गरम वनभोजनाचा आनंद मिळाला. जेवताना आजूबाजूला जे काही पक्षी होते त्यांचा किलबिलाट सतत चालू होता म्हणून आनंद द्विगुणीत झाला.
एकच खंत लागून राहिली अशा या वातावरणामध्ये बर्थडे सेलिब्रेशन साठी एक केक असता तर सोने पे सुहागा अशी भावना आमची झाली असती. असो तरीही आम्ही लवकरात लवकर घरी पोहोचलो आणि आरवच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी केक पिझ्झा आणि इतर गोष्टी ह्यांची अरेंजमेंट करू लागलो.
आजचा दिवस आमच्यासाठी यादगार म्हणूनच राहील कारण अशा प्रकारे बर्थडेचे सेलिब्रेशन आम्ही कधीच केले नव्हते.
आज आपण तीन जागी भेट दिली होती पहिली जागा खंडेरायाचे मंदिर मूळगावातलं दुसरी जागा बारावी धरणातून जो पाण्याचा स्त्रोत वाहत आहे ती आणि तिसरी जागा बारवी धरणाच्या परिक्षेत्रातील बर्ड व्ह्यू पॉईंट हे तीनही पॉईंट एका दिवसात आपण सहजपणे कव्हर करू शकता आणि पिकनिक साठी अत्यंत उत्तम असे आहेत.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.
YouTube:
https://youtu.be/EfS3-lq7f7Y
Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp number: ९९६७१५२९३८
जर आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता तर मग खालील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube वर उपलब्ध आहेत.
कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा