26जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केलेला १२ जणांचा (मुंबईकर आणि पुणेकर मंडळी) TTMM ट्रेक, किल्ले सोनगिरी/ पळसदरीचा किल्ला
🚩🚩सादर जय शिवराय🚩🚩
नमस्कार मंडळी🙏
26 जानेवारी च्या निमित्ताने आम्ही मुलांसाठी एक साधा सोपा ट्रेक शोधत होतो. मुले पण तयार होती ट्रेक करण्यासाठी बरेच दिवसांनी त्यांनी कोणताही ट्रेक केला नव्हता, परंतु शाळेतून खबर आली 26 जानेवारीला मुलांचा खास प्रोग्राम आहे म्हणून मुलांना शाळेत जावे लागले.
किल्ले सोनगिरी साधा सोपा ट्रेक म्हणून मुद्दामून ठेवणीत ठेवला होता.
हा ट्रेक आम्ही TTMM (टी टी एम एम म्हणजे तू तुझं मी माझं आणि वाजवी खर्चामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून पूर्ण केलेला ट्रेक) या तत्त्वावर करायचे ठरवले होते तरीही या ट्रेक साठी मुंबईतून चार् जण आणि पुण्याकडून आठ जण असे ट्रेकर मंडळी आले होते. तसे आपले TTMM तत्वावर आधारित भरपूर ट्रेक झाले आहेत, ते लेख स्वरूपात आणि व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत ह्याची नोंद घ्यावी.
किल्ले सोनगिरी हा पळसदरी स्टेशनच्या बाजूलाच असणारा किल्ला आहे. पळसदरी स्टेशन हे कर्जतच्या पुढील पहिलेच स्टेशन खोपोली कडे जाताना लागते. हा ट्रेक ट्रेन नी केल्यास फार वेळ वाचतो आणि अवघ्या साठ रुपयांमध्ये जाऊन येऊ शकता. जाताना फक्त ट्रेनचे वेळापत्रक बघून घ्या, वेळ वाया जाणार नाही, कारणं कर्जत खोपोली ट्रेन साधारण दर १ तासाने आहे. तसे कर्जत पळसदरी दरम्यान अंतर जास्त नाही आपण चालत पण पार करू शकता.
ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे पळसदरी स्थानकात ८.५ वाजता पोहोचलो. पुण्याची पाच मंडळी कारने आले होते त्यांनी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच स्वामी समर्थांच्या मठात गाडी पार्क केली कारण तिथे भरपूर चांगल्या प्रकारची पार्किंगची सोय आहे. उरलेली पुण्याकडची काही मंडळी ट्रेन लेट झाल्यामुळे साडेनऊ पर्यंत पळसदरीला पोहोचणार होते.
दीड तास वाट बघण्यापेक्षा सर्वानुमते आम्ही ट्रेक सुरु करायचे असे ठरवले. पळसदरी पासून पुढे खोपोलीच्या दिशेने दोन वेगवेगळे रेल्वे ट्रॅक निघतात उजव्या बाजूचा एक ट्रॅक हा लोकल ट्रेनचा आहे तर डावीकडील तीन ट्रॅक हे एक्सप्रेस गाड्यांचे आहेत. आपल्याला पळसदरी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला एक्सप्रेस ट्रेनचा डावीकडील ट्रॅक निवडावा लागतो याची नोंद घ्यावी.
मुंबई पुणे ही रेल्वे लाईन फार व्यस्त रूट मध्ये मोडते त्यामुळे येथे दर पाच मिनिटांनी एक ट्रेन जात असते, त्यामुळे रेल्वे ट्रॅक वरून चालताना सांभाळून चालावे विशेषत: लहान मुलांनी. इथे चालताना हेडफोन वापरू नयेत, पुढे आणि मागे रेल्वे ट्रॅक वर सारखे लक्ष केंद्रित करून ठेवणे ही काळाची गरज आहे.
पंधरा ते वीस मिनिटात आपण समोर पहिल्या बोगद्या पर्यंत पोहोचतो. समोरच डाव्या बाजूला आपल्याला १०४/२४ आणि १०४/२६ हे रेल्वेचे पोल दिसतात. उजव्या बाजूला आपल्याला एक सफेद रंगाची केबिन दिसते. या दोन पोलच्या बरोबर मध्यभागी एक रस्ता जातो ती मळलेली वाटच आहे. समोरच तुम्हाला किल्ले सोनगिरी असा दिशा निर्देशक पाटी दिसते. दोन पावलं पुढे गेल्यानंतर आपल्याला वाटेत एक भला मोठा दगड लागतो ज्या दगडावरती डाव्या बाजूला मार्गदर्शकाचा बाण केलेला आहे. हे निशाण लाल रंगाच्या ऑइल पेंटने केलेले आहे पण ते निशांण चुकीचे आहे कारण की डाव्या बाजूला आपण गेलो तर तो रस्ता चुकीचा आहे त्यामुळे तिथे जाऊ नये, दगडाच्या वरती ची पायवाट जाते त्याच वाटेने सरळ डोंगराच्या वरती जावे लागते. वाटेमध्ये भरपूर दिशादर्शक पाट्या लावलेल्या आहेत आणि एक मोबाईल नंबर ही दिला गेला आहे जर आपण जंगलामध्ये कुठे हरवलात तर मदतीसाठी या नंबर वरती संपर्क करू शकता.
जसजसे आपण पुढे चालतो तस तसा चढ हा वाढतच जातो सुरुवातीचाच चढ हा मोठमोठ्या दगडांमधून आणि खडा आहे. ही जागा जंगल सदृश्य असल्यामुळे इथे जरा जास्तच झाडी वाढलेली आहे आणि माणसांचा राबता फार कमी असल्यामुळे इथे गवत ही माजलेले आहे. अशाच रस्त्यातून पायवाट काढत आपल्याला पुढे जवळ जवळ अर्धा तास चालावे लागते. मधे मधे थोडे पठार सदृश्य जागा लागतात तिथे भरपूर गवत माजलेले आहे. साधारण 30 ते 40% आपण चढल्यानंतर समोरच एक उभा कातळ लागतो तो भाग जरा कठीण आहे पण कातळाच्या डाव्या बाजूने आपण वर सहज चढून जाऊ शकता. हा संपूर्ण रस्ता डोंगराच्या धारेवरून आपण चालत असतो त्यामुळे सावधान आणि मधे मधे पठारही लागतात पण सगळ्यात मोठं असं पठार अतिशय रम्य आहे सगळं सुकलेले पिवळं गवत आहे आणि आजूबाजूला ची वृक्षसंपदा ही भरपूर सुंदर आहे. ह्या किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर नद्या आणि धरण असल्यामुळे इथे पक्षी आणि वन्यसंपदा भरपूर आहे. हिंस्त्र प्राणी ही तुम्हाला पण दिसू शकतात त्यामुळे जर आपण शांततेतून इथून प्रवास करत असाल तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल.
आम्ही बारा जण होतो तरीही बारा जणांपैकी मला एकट्यालाच तिथे एक लांडोर दिसला कारण की मी सगळ्यात शेवटी चालत होतो आणि तो माझा कानवा घेत माझ्या पुढे चालत होता त्याला जशी माझी चाहूल लागली तसा तो तिथून पळून गेला. मी पटापट खाली उतरत असल्यामुळे ना त्याचा फोटो काढू शकलो ना त्याचा व्हिडिओ काढू शकलो. माझ्या आधीच्याही लेखामध्ये मोराचा उल्लेख भरपूर मिळाला असेल कारण की हे वन्यक्षेत्र असल्यामुळे या परिसराच्या आजूबाजूला मोरांची मुबलकता भरपूर आहे.
असो पठार संपल्यानंतर परत एक छोटा जंगल पॅच चालू होतो तो आपण पार पाडलात की एका डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोहोचतो हाच तो शेवटचा टप्पा इथे दोन डोंगरांच्या मध्ये एक घळ सदृश्य जागा तयार झाली आहे. ह्या जागेमध्ये जमीन ही भुसभुशित मातीची आहे त्यामुळे येथे सांभाळून चाला मधे मधे कातळात थोड्या रचलेल्या दगडाच्या पायऱ्या ही दिसतात बहुदा गड संवर्धनाच्या हेतूने ह्या पायऱ्या बांधल्या गेल्या असाव्यात. जिथे घळ संपते तिथे आपल्याला थोडीफार गडाची तटबंदी दिसायला सुरुवात होते. ही तटबंदी सध्या जीर्ण अवस्थेत आहे तरीही या तटबंदीवर उभे राहून फोटो काढण्याचे टाळावे कारण की हे दगड कधीही निखळून पडू शकतात. गडावरती एक भले मोठे पाण्याचे टाके आहे. हे टाके उघडे असल्यामुळे वाऱ्याने येणारा कचरा या पाण्यावरती जमा होतो तरी हे पाणी निळे क्षार आणि पिण्याजोगे आहे वरचा कचरा आपण अलगद हाताने बाजूला करून आपण हे पाणी पिण्यासाठी वापरू शकता.
आरामात गड चढायला २ तास तर उतरायला १.५ तास पुरे आहेत.
हा गड म्हणजे एक डोंगर माथा आहे हा पूर्वेला आणि पश्चिमेला विस्तृत पसरलेला आहे ह्या गडावर ती उत्तर आणि दक्षिण दिशेला कोणतीही विभागणी नाही. पश्चिमेकडचा भाग पनवेल दिशेला आहे तर पूर्वेकडचा भाग मावळा बाजूला किंवा खोपोली बाजूला आहे. गडाच्या पश्चिम टोकाला एक भला मोठा भगवा फडकत आहे तो ध्वज आपल्याला फार लांबूनही दिसतो.
ह्या गडावर ती फिरताना सांभाळून कारण की आपण संपूर्ण गड फिरताना डोंगराच्या धारेवरून चालतो तिथे गवत माजले आहे सुक्या गवतावर पाय देणं टाळा कारण की उतरणीवरील गवतावर पाय घसरून अपघात होऊ शकतो.
हा डोंगर बरोबर लोणावळ्याची, माथेरान आणि भीमाशंकर डोंगररांग यांच्या मधोमध आहे आजूबाजूच्या परिसरात जवळ कोणतेही मोठे डोंगर नसल्यामुळे आपण लांब पर्यंतचा भूभाग इथून बघू शकतो म्हणूनच या डोंगराला इतिहासमध्ये एक टेहाणीचा बुरुज वजा किल्ला म्हणून संदर्भ आहे. जर वातावरण स्वच्छ असेल तर आपल्याला लांब पर्यंतचे डोंगर किल्ले दिसतात जसे इर्षाळगड प्रबळगड माथेरानची डोंगररांग, खंडाळ्याची डोंगररांग आणि ढाकचा किल्ला.
26 जानेवारी चे औचित्य साधून आपण आपल्याबरोबर एक तिरंगा ही घेतला होता त्या तिरंग्याला आम्ही गडावर फडकवले थोडेफार फोटो काढले, नाश्ता वजा जेवण केले आणि गड उतरायला सुरुवात केली.
गड लहान असल्यामुळे नऊ वाजता सुरू केलेला ट्रेक आम्ही साधारण दीड वाजेपर्यंत पूर्ण केला.
गड जरी लहान आणि डोंगर माथा समोर दिसत असला तरीही आपण १३.५ किलोमीटरचा पल्ला त्यादिवशी गाठला आणि ऐकून १८५०० पावलं आपण चाललो. गडाचा सर्वोच्च भाग समोरच दिसतो तरीपण त्या गडाच्या माथ्यावरती पोहोचण्यासाठी आपल्याला भरपूर कसरत करून छोट्या मोठ्या डोंगरांना वळसा मारून जावे लागते ह्याची नोंद घ्यावी.
ह्या ट्रेक मध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळीचे आभार, कारण हा ट्रेक तुमच्या सहकर्याशिवाय पूर्ण झाला नसता. ह्या संपूर्ण ट्रेक मध्ये खेळी मेळीचे आणि सहकार्याचे वातावरण होते. आशा करतो आपली भेट पुन्हा लवकरच होईल.
पळसदरी स्टेशनावरती किंवा गडाकडे जाताना कोणतेही दुकान नाही त्यामुळे खाण्या आणि पिण्याचे सामान बरोबर बाळगणे हे फायदेशीर ठरते.
हा गड चढण्यासाठी पावसाळ्याच्या नंतरचा काल आपण निवडावा त्यावेळी गर्द हिरवी झाडी आणि लांबपर्यंतचा भूभाग दिसू शकतो थंडीमध्ये धुक्याचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे जास्त लांबचे किल्ले आपल्याला इथून सध्या दिसत नाहीत.
जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास साध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर खालील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
YouTube video link: https://youtu.be/B8lEhgAb7QY
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp number: ९९६७१५२९३८
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, मला वेळेचे गणित जुळल्यास मी सुध्दा जरूर सहभागी होईन.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा