पन्हाळा ते पावनखिंड मोहीम, ही मोहीम नुसती भ्रमंतीचीसाठी नव्हती तर मावळा बनून अंतर्मुख होऊन जगण्यासाठी होतीनमस्कार मंडळी🙏

पन्हाळा ते पावनखिंड मोहीम, ही मोहीम नुसती भ्रमंतीचीसाठी नव्हती तर मावळा बनून अंतर्मुख होऊन जगण्यासाठी होती.


नमस्कार मंडळी🙏

जय शिवराय🚩

हर हर महादेव, जय शिवशंकर

बरेच वर्ष ईच्छा होती पण ती पूर्ण होत नव्हती, शेवटी ऑफबीट ट्रेकर्सचे पुणे येथील श्री शरद बाचुटे यांनी ग्रुप वर मेसेज पाठवला, आम्ही जाणार आहोत, कोण येणार असेल तर कळवा, तेव्हा फोन वर बोलून घतले आणि मला पण येण्याची ईच्छा आहे असे कळवले. तेव्हा ते बोलले जरूर या.

त्यावेळी मुंबईतून मी एकटा होतो, बरोबर कोणी नव्हते म्हणून मनावर थोडे दडपण होते.

ऑफबीट ट्रेकर्स म्हणजे तुफान सिंहगड एक्स्प्रेस आणि आपण मुंबई लोकल हे गणित जुळणारे नव्हते तरीदेखील प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी तयार झालो.

भर पावसात हा ट्रेक करायचा म्हणजे फार विचार करायला लागतो, दोन दिवसाचे कपडे, झोपायचे सामान, प्रथमोपचार औषध आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे जळू. सगळी तयारी झाली पण जळुशी सामना कसा करायचा. या विषयावर अभ्यास चालू झाला आणि लागणाऱ्या बचावाच्या युक्त्या, वस्तू औषध यांची तयारी पण झाली.

बा रायगड परिवार या संस्थेने ही मोहीम आखली होती आणि ती देखील मुंबई ते मुंबई म्हणून मी तयार झालो, बहुदा हे ट्रेक पुणे ते पुणे असतात.

मोहिमेला निघण्याचा दिवस उजाडला, मुंबईतून Simple Lifestyle Vlogs/ Borivali Hikers चे ५ जण या मोहिमेला जगण्यासाठी तयार झाले होते. रात्री ८ वाजता निघणारी बस काही लेट लतिफ मुळे ९ वाजता निघाली, सकाळी कोल्हापूर गाठले.

मोहिमेला हिरवा कंदील देण्यासाठी शिवा काशिद यांच्या समाधिपशी त्यांचे वंशज आले होते, त्यांच्या कडून पन्हाळा गडाचा इतिहास आणि शिवा काशिद यांच्यामुळे कसा इतिहास घडला आणि छत्रपाती शिवजी महाराजांची सुटका झाली याचे ज्वलंत भाषण दिले जणू काही प्रसंग डोळ्यांसमोरून सरर करून सरकला.

३५० मावळ्यांनी, आसमंत अगदी महाराजांच्या आणि वीरांच्या नावाच्या जयजयकाराच्या घोषणांनी दुमदुमून काढला होता अशातच आमची मोहीम शिवा काशिद यांच्या समाधी स्थळाकडून मार्गस्थ झाली.

पन्हाळा गडावर आलो, चौकात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भव्य पुतळा आहे, तिथे जमाव थांबला, इथे महाराजांचे प्रेरणा मंत्र बोलून, बाजीप्रभु यांना मान वंदना दिली. परत उद्घोषणा सुरू झाल्या आणि आम्ही पुढे महाराज ज्या मार्गाने मार्गस्थ झाले होते ती वाट धरली.

हा दिवस पहिला असल्यामुळे मोहीम कठीण नव्हती, गडावरून मागच्या बाजूने उतरून पुढे मासाईचे पठार गाठायचे होते. मध्ये हिरवीगार भात शेती, एक खळखळणारा ओढा आणि मध्येच कठीण अशा चढाईची खिंड पार करायची होती. डोंगर चढताना दमछाक झाली. 

वातावरण थंड होते, पाऊस नव्हता, आम्ही मसाई पठारावर आलो. ही जागा अद्भुत होती, सगळीकडे नजर जाईल तिकडे पोपटी गवताची लव्हाळी लवलवत होती, गायी चरत होत्या, पक्षी किलबिलाट करत होते, आणि निळेशार क्षितिज समोर दिसत होते. मसाई पठारावर थोडी फार गावतळी तयार झाली होती त्यामुळे इथे एक प्राणी आणि पक्षांची परीसंस्था तयार झाली होती.

यावर्षी पाऊस बरोबर झाला नाही म्हणून रानफुले सहसा दिसली नाहीत, एखाद दुसरे फुल नजरेस पडत होते.

पठार एवढे मोठे होते की जवळपास पार करता करता दुपार झाली, मसाई देवीच्या मंदिर परिसरात बसून सगळ्यांनी मिळून दुपारचे जेवण केले. जेवणात चपाती आणि मटकीची सुकी भाजी यांचे पाकीट होते. मुंबई करांसाठी भाजी बेताचीच तिखट केली होती.

सगळे कसे नियोजन बद्ध चालेल होते, बा रायगड परिवाराचे कौतुक करावे तेवढे कमीच होते.

पुढे आम्ही मसाई पठार उतरून खालच्या वाड्यांच्या डांबरी रस्त्याला लागलो. इकडेच आम्हाला कावर खिंड नावाची जागा दिसली, जिथे लाव्हारसा पासून मोनोलिथिक दगडांचे structure दिसते, ते एक अदभुत आहे. गावात वेगवेगळ्या गोष्टी प्रचलित आहेत त्यासाठी. दुपारचे जेवण झाल्यामुळे आणि मध्येच कड्क ऊन तर मध्येच पाऊस असा निसर्गाचा खेळ चालला होता, त्यात सगळ्यांचेच प्यायचे पाणी संपले, कुंभरवाडीत पाणी मिळाले नाही पण खोतवाडीत मिळाले, आत्मा तृप्त झाला भरपूर पाणी प्यायलो, एव्हाना दुपारचे उनाचे चटके लागत होते. एक एक वाडी मागे टाकत आम्ही खोतवाडीच्या वेशीवर पोहोचलो, सगळे वेळेत चाल धरून होते मग इथे थोडी विश्रांती घेतली.

थोड्या विश्रांती नंतर करपेवाडिकडे कूच केली, पुढचा रस्ता हा शेतातून, चिखलातून, बांधावरून होता, थोडा कठीण होता. सरतेशेवटी जंगलाचा भाग होता. इथे निलगिरीच्या झाडांची भरपूर लागवड आहे, ह्या झाडाला पानगळ भरपूर होते, पाऊस पडला की पाने कुजतात आणि चिखल होतो. इथेच जळूची पैदास वाढते. जर इथे पाणी साचले असेल तर सांभाळून, रानातून बाहेर पडताना शूज, कपडे सगळे तपासा आणि मगच पुढे चाल करा.

जंगल मागे सोडताच आपण अंबेवडित पोहोचतो, अंबेवडीत येता येता संध्याकाळ झाली होती, थोडा अंधार झाला होता, पाऊस ढगात दाटला होता, समोरचा नजारा अद्भुत होता, एका बाजूला हिरवा डोंगर तर दुसऱ्या बाजूला भात शेतीचे पठार आणि त्यापुढे खाली खोलवर दिसणारी गाव आणि आजूबाजूची भातशेती आणि पलीकडे आसमंत आणि त्या वरती काळ्या ढगांची दाटी. ही जागा अशी होती की क्षणभर विश्रांती जरूर बनते पण डोक्यावर पाऊसाचे ढग नाचत होते मग काय चाल पुढे ठोकली ती थेट करपेवडी गाठली.

संपूर्ण रस्त्यात लहान मुले चॉकलेट, बिस्कीट, पेन्सिल, वह्या, खोड-रब्बर अशा वस्तूंची मागणी करत होते, आम्हाला आधीच सूचना दिल्या होत्या, म्हणून आपापल्या इच्छेप्रमाणे वाटपाच्या वस्तू बाळगल्या होत्या.

वाटेत आम्हाला कष्टकरी शेतकरी दिसले, त्यांची मेहनत बघून डोळ्यात पाणी आले. सलाम त्यांच्या मेहनतीला.

पूर्ण रस्त्यात चिराच्या दगडांची कौलारू छोटेखानी घरे होती, अशाच एका घरात आम्ही राहिलो होतो. दिवसभराची दमछाक झाल्यानंतर आम्ही सगळे घरात बसून बत्तीम बाजी आणि दिवसभरात घडलेले किस्से ऐकत होतो, कपडे, बॅगा आवरल्या, झोपायची अंथरूण पडली तोच बाहेरून पुकारा आला, जेवण तयार आहे.

दिवसाचा क्षीण गरम गरम जेवण बघताच भुर्रर करून उडून गेला, मिक्स अशी सरसरीत भाजी, कडक भाकरी बहुदा ज्वारीची असावी, तिला कुस्करून भाजीत मिसळायची आणि खायची, तांदळाची भाकरी, मसाले भात, शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा त्यावर दही, असा बेत झाला. तिखटाच बेतानेच होते मुंबईकरांसाठी.

मनसोक्त भरपेट जेवण झाले, शेणाने सारवलेल्या जमिनीवर झोपण्याचा योग भरपूर वर्षांनी आला, त्याची मजा लुटतच शांत झोप कधी लागली ते कळलेच नाही.

नेहमी प्रमाणे पहाटे ४ ला गजर न लावताच जाग आली, ५ वाजता सगळे उठलो, प्रात:विधी आटोपून घेतला. सगळ्या सामानाची जमवाजमव केली.

सकाळी ६ वाजता गरम गरम कांदे पोहे आणि वाफाळता चहा त्यात सकाळचे थंड वातावरण, पक्षांचे गुंजन चालू होते.

सकाळी ७ वाजता घोषणा देऊन आसमंत दुमदुमून काढून आम्ही करपेवडीतून वरच्या बाजूच्या जंगलात प्रवेश केला, हे परत निलगिरीचे बन होते, पान कुजली होती, मनाला धस झाले, जळूची आठवण झाली, लगेच सावरून घेतले आणि या जागेतून पळ काढला.

माझ्या पुढे २०० तर मागे १५० असे मावळे होते, एकदा पुढून घोषणा तर कधी मागून घोषणा, असा संपूर्ण आसमंत दुमदुमून निघाला होता. भरपूर चाल दिलीं तरी घोषणा संपन नव्हत्या. 

आता आम्ही एक एक वाड्या करत पुढे चाललो होतो, आजची मोहीम कठीण होती. जंगल, चिखल, भातशेती, पाणथळ भाग, डोंगरावरून वाहणारे ओढे, धबधबे आणि बरोबरीला पक्षी, गायी, म्हशी, अशातून मार्गक्रमण करत होतो. आजचा रस्ता बऱ्याच प्रमाणत जंगलातून होता, वाटेत वेगवेगळी झाडे कधी निलगिरी, कधी करवंद, कधी बांबू, तर कधी विविध जंगली झाडांची बने आहेत.

आम्ही संपूर्ण गावाचा वातावरणाचा अनुभव घेत होतो, या मोहिमेचा मूळ उद्देश हाच होता की, रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराज, बाजी प्रभू आणि ६०० मावळे यांनी, शत्रू पाठीवर असताना हा प्रवास रात्रीच्या अंधारात कसा काय केला असेल याचा सुगावा घेण्याचा.

पण आजच्या काळात आपण, पाठीवर बॅगा, पाणी, जेवणाचे सामान, मोबाईल, GPS अशी सोय करूनच अशा मोहिमांवर आपण बाहेर पडतो तरी जंगलात रस्ता चुकतो.

त्याकाळात अशा सोयी सुविधा होत्या का? तरीपण महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, मावळ पिंजून काढला, शत्रूला जेरबंद केले आणि आपले आजचे आयुष्य सुखकर केले.

असो, जंगलातून चालून थकलो शेवटी मानवाड इथे आम्ही डोंगर उतरून रस्त्याला लागलो.

थोडे चालल्यानंतर आम्हाला पावनखिंड ४ किलोमीटर असा बोर्ड दिसला जिवात जीव आला, आज पण मध्येच पाऊस तर मध्ये कडक ऊन असा खेळ चालू होता.

वाटेत एक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली विहीर पण बघितली, ती मेन रस्त्यावर आहे पण थोडी आतली वाट धरावी लागते.

पांढरेपाणी इथे दुपारच्या जेवणाची सोय होती, जेवण सुंदर होते, मग लगबगीने आम्ही पावनखिंडी कडे कूच केली.

पावनखिंड बघून बाजींच्या पराक्रमाने आणि मराठ्यांच्या रक्ताने न्हाऊन निघालेली   घोडखिंड पावन झालेली बघितली. बाजींना नमन केले. मनाला शांती लाभली मोहिमेचे चीज झाले.

आजच्या घडीला आपल्याकडे शुरविर असे पराक्रम करण्यासारखे काही शिल्लक राहिले नसेल तरी पण आपण सध्या फक्त माणूस बनुन राहणे हेच उचित वाटते.  हीच एक छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे आदरांजली असेल.

पावनखिंड अनुभऊन झाल्या नंतर बा रायगड परिवारातर्फे लाठी काठी, तलवारबाजी, असे मर्दानी शास्त्रांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती, त्याचा यथेच्छ आनंद लुटला.

हो एक महत्त्वाची बाब, या मोहिमेच्या दरम्यान, काही दूरच्या ट्रेकर मित्रांची भेट सुद्धा झाली कारण आम्ही फक्त फेसबुक,  Whtasapp किंवा YouTube ह्याच माध्यमातून संभाषण करत असतो, त्यामुळे सामोरा समोर धावती का होईना पण भेट होणे हे फार कठीणच असते, पण ह्या मोहीमेत अशी भेट माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आनंद देऊन गेली.

बा रायगड परिवाराचे नियोजन वाखाणण्याजोगे होते, आम्ही दोन बॅग केल्या होत्या, मुख्य सामानाची बॅग ही गाडीतच असायची आणि आमच्या पाठीला एक पाणी, सुका खाऊ, वाटायच्या वस्तू अशी आखणी केली गेली होती. परिवारातील सदस्य फार मनमिळाऊ आणि काही गरज पडल्यास लगेच तत्पर हजार असे होते. त्यांचे खूप खूप कौतुक आणि मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळे ही मोहीम कधी पूर्ण झाली कळलेच नाही.

सध्या मोजकेच फोटो जोडत आहे, फोटो भरपूर आहेत पण कोणता जोडू आणि कोणता सोडू असे झाले आहे, पुढे क्रमशः फोटो टाकीन.

ह्या अनुभव रुपी व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे दिली आहे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.

YouTube video link:
स्वराज्यव्यापी महामोहीम पन्हाळा ते पावनखिंड 50Km #trek ३५० मावळे
https://youtu.be/8RPhjNkO0Vc

पावनखिंडीतले शिवकालिन मर्दानी खेळ https://youtu.be/fNPOuTKNXEs
या मोहिमेत सहभागी झालेल्या समस्त ट्रेकर मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे ही मोहीम फत्ते झाली.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा. 

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली