"थोडक्यात फसलेल्या सोलो ट्रेकचा एक थरारक प्रसंग"

"थोडक्यात फसलेल्या सोलो ट्रेकचा एक थरारक प्रसंग"

नमस्कार मंडळी,

आपण नेहमी सोलो ट्रेकिंग या विषयावर वर भरपूर चर्चा करत असतो, काही जण बोलतील की ते करावे तर काही जण बोलतील की ते का करू नये, पण कधी कधी अशी वेळ येते की ते करणे भाग पडते आणि आपण मनात इच्छा नसताना देखील ते करतो. 

(मला जाणकार वरिष्ठ ट्रेकर मंडळीनी सूचना दिल्या होत्या की मी हा ट्रेक सोलो करू नये, पण मला दुसऱ्या दिवशी नाणेघाट ते भीमाशंकर हा ठरलेला ट्रेक करायचा होता त्यासाठी मला नाणेघाटात सकाळी ७ वाजेपर्यंत पोहोचायाचे होते आणि तसे वाहन उपलब्ध पण नव्हते म्हणून मी आदल्या दिवशी सोलो ट्रेक करायचा निर्णय घेतला.)

असाच एक किस्सा माझ्याबरोबर घडला मागच्या शुक्रवारी मला टोकावडे गावातून नाणे घाट चढून घाटघरला जायचे होते. बरोबर काही ट्रेकर मंडळी येणार होती पण काही कारणास्तव ते सगळे रद्द झाले आणि मला एकट्याला हा ट्रेक करावा लागला.

मनात थोडी भीती होती, कारण जुन्नरच्या वन क्षेत्रात भारतातील सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे आणि मला सकाळी लवकरच ट्रेक चालू करायचा होता, कारण काही चुका झाल्या तर वेळ हातात ठेवता येईल आणि सूर्यास्ताआधी नाणेघाट पार करता येईल.

सकाळी ८-८.३० च्या दरम्यान ट्रेक चालू केला, शुक्रवार असल्यामुळे वाटेत कोणीही नव्हते संपूर्ण जंगलात मीच एकटा होतो त्यामुळे कुठेही पाणी किंवा लघुशंका करण्यासाठी पण थांबा घेतला नाही. चालताना चहू बाजूला बघत चाललो होतो. साशा सारखे कान टवकारून ठेवले होते, कुठे काही हालचाल होते का हेरण्यासाठी. नेहमी प्रमाणे सगळ्यात मळलेली वाट धरली होती. अर्ध्यावरील डोंगरात नेहमी प्रमाणे गावकऱ्यांनी भरपूर पायवाटा तयार केल्या होत्या त्यामुळे फार मनाची द्विधा मनस्थितीत झाली होती की कोणती वाट निवडावी आणि कोणती सोडावी. त्यातच कुठेतरी चूक झाली.

सरते शेवटी अशी एक जागा आली की सगळ्या वाटा संपल्या, आणि पुढे गच्च असे जंगल चालू झाले. (मला मागील वर्षी केलेल्या रतनगडाची आठवण झाली, कारण तेव्हा पण मी वाट चुकल्याने जंगलात हरवलो होतो, पण तेव्हा मला सम्राट ते हरिश्चंद्रगड गड ही घाट वाट माहिती होती म्हणून ती शोधून वेळ मारली होती.)

पण आज ह्या ट्रेक वर मी निर्भय होतो ते GPS system वर पण बहुदा मला कोणतेही GPS निदान जंगल ट्रेकवर वापरता येत नाही असा प्रार्थमिक अंदाज होता आणि तसेच घडले, माझी GPS यंत्रणा कुचकामी ठरली.

(मागच्याच हप्त्यात वरिष्ठ ट्रेकर श्री. उदय चव्हाण यांनी हा ट्रेक केला होता तेव्हा मी दोन दिवस आधी त्यांच्याशी फोन वर बोलणे केले होते आणि त्यांनी मला थोडा guidance दिला होता. तसे मी उदय सरांशी नेहमी वेगवेळ्या ट्रेक संदर्भात सल्ला मसलत करत असतो आणि ते अचूक माहिती सतत पुरवत असतात)

जसे वर चढत होतो जंगल अधिकच घानदाट होत होते, सकाळ असून पण अंधार वाटत होता, आणि किर् किर असा रातकिड्यांचा आवाज पण वाढत्या अंधारा बरोबर वाढत चालला होता.

फोन बघितला GPS काम करत नव्हते पण मोबाईल नेटवर्क range होती, मग उदय सरांना फोन लावला आणि आजू बाजूच्या असणाऱ्या गोष्टीचा आढावा दिला पण आम्हाला माझी पोझिशन नक्की करता येत नव्हती, पण एक गोष्ट पक्की होतो की मी बरोबर नानाच्या अंगठ्याखाली होतो. त्यांना जागेचा फोटो पाठवला तरीही आमचा निर्णय होत नव्हता. मग हे आम्ही नक्की केले की मी वाट भरकटकलो आहे.

एव्हाना मी डोंगराच्या मध्यावर होतो म्हणून ऐकाच उंचीवर समांतर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याला छेद देणाऱ्या वाटा शोधू लागलो. दोन तीन डोंगरांची पठारे धुंडाळून झाली पण मला माथ्याकडे जाणारी वाट भेटली नाही.

उदय सरांशी सतत बोलणे चालू होते त्यामुळे मी निर्धास्त होतो. मी थकलो होतो आणि पोट खाली अशा परिस्थितीत होतो, डोके काम करत नव्हते म्हणून एक चांगली जागा शोधली आणि पहिला ब्रेक घेतला पणी आणि थोडा नाश्ता केला, बरे वाटले, अशा परिस्थितीत आपला मानाचा ताबा सुटू शकतो पण मी शांत राहिलो, कुठेही हृदयाचे ठोके वाढून दिले नाहीत.

५ मिनिटांचा आराम केला, मग परत उदय सरांचा फोन आला, आत्ता १० वाजले होते, आमचे बोलणे झाले की १२ वाजे पर्यंत वाट भेटली तर ठीक नाहीतर परतिचा रस्ता धरायचा, त्यांनी पण त्या निर्णयाला दुजोरा दिला, कारण खाली उतरायला पण मार्ग तर शोधावा लागणार होता. मी जंगलात भरकटकलो होतो.

आत्ता फक्त २ तास हातात होते, परत तेच डोंगराच्या समांतर पातळीवर पायवाट कुठे भेटते का याचा शोध चालू झाला. मला मनातून भावना होती की मला कुठे तरी छेदणारी वाट भेटणार आणि पुढच्या १० मिनिटात ती भेटली आणि सुटकेचा निःश्वास सोडला.

लगेच उदय सरांना फोन लावला पण ते बोलले की वाट मिळाली आहे पण ती नक्की कुठे जाते याची शहानिशा करणे गरजेचे आहे. त्यांनी काही निषाण्या ओळखीच्या जागा सगितल्या, मग मी त्या वाटेत शोध्याला पण त्या काही मिळाल्या नाहीत, कारण मी त्या निशाण्याच्या पण वर थेट पायरी मार्ग जिथे चालू होतो तिथे पोहोचलो होतो.

परत एकदा छोटा break घेतला आणि निर्धास्त झालो आणि पुढील ट्रेक दुपारी १२ पर्यंत पूर्ण केला.

ह्या सगळ्या प्रकारात उदय सरांनी जो back-up दिला आणि माझे मनोबल खचू दिले नाही त्या बद्दल त्याचे शतशः आभार आणि ते मी असे शब्दात व्यक्त करू शकत नाही.

म्हणूनच अनुभवी ट्रेकर मंडळीच्या बरोबर ट्रेक करणे, सल्ला मासलत करणे, वेगवेगळे प्रश्न विचारणे, अनुभव समजून घेणे गरजेचे आहे, त्यातून आपल्याला सतत काही शिकायलाच मिळते, आपल्या ज्ञानात भर पडते.

उदय सरांचे पुनश्च धन्यवाद, आम्हाला आपले मार्गदर्शन सतत लाभो 🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली