मी पावसाळ्यात अनुभवलेला अभूतपूर्व असा माळशेज घाट
मी पावसाळ्यात अनुभवलेला अभूतपूर्व असा माळशेज घाट
नमस्कार मंडळी,
पावसाची चाहूल लागली की धरणी माता जुनी कापड बदलून हिरवा शालू नेसते, ती खुलून येते, तिच्या अंगा खांद्यावर लव्हाळी लवलऊ लागतात...... जास्त काही लिहिण्यापेक्षा ज्येष्ठ कवियात्री शांता शेळके बाईंनी लिहिलेली समर्पक कविताच बघुयात,
आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग
आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥
कोसळल्या कश्या, सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥
लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥
झाडांवरी मुके, पाखरांचे थवे
वीज लालनिळी, कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥
वीज कडाडतां, भय दाटे उरीं
एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग ॥ ५ ॥ – शांता शेळके
या पावसासाठी माझे शब्द अपुरे पडतील असा साग्ररस या कवितेतून प्रतीत होतो.
महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण म्हणजे भटक्यांची पंढरी. निसर्गाची हिरवाई, काळे सफेद ढग, धुके, काळे शार असे डोंगर, आणि त्या वरतून फेसाळणारे धबधबे असा माहोल घाट रस्त्यात तयार होतो.
भरपूर वर्ष ईच्छा होती की माळशेज घाटात फिरायला जावे पण गर्दीचे फोटो बघितले की जीव नकोसा होत असे. म्हणून अजून पर्यंत कधीही बेत केला नाही.
यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला, मुंबईत तर नाहीच असे वातावरण. अशातच काही ठिकाणी पाऊस जोरदार चालू झाला होता, आमची पावसाळी भटकंती सुरू झाली नव्हती.
अशातच आम्ही ऐका रविवारी मुरबाड दिशेला एका कमी गर्दीच्या धबधब्यावर जायचे ठरवले, त्या रात्री भरपूर पाऊस झाला होता, प्रवास चालू केला, वाटेत मस्त असा हिरवाईचा शालू, शेतीची कामं दिसली, पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या, धरणे, तळी दिसली.
गाडी अर्ध्या रस्त्यात पोहोचली, मग विचार केला की आपण माळशेज का नाही गाठत, मस्त माहोल तर तयार झाला होता. मग गाडी तिकडे वळवली.
पहाटे 3 वाजता उठून, 4ला प्रवास चालू केला. 7.30 वाजता मुरबाड सोडून घाट सुरू झाला. पावसाची रीप रिप चालूच होती.
माझी ही पहिली खेप होती या घाटाची, मला घाटाची किंवा ठिकाणांची तिळमात्र कल्पना नव्हती.
घाट सुरु होता क्षणी चहूकडे धुके पसरलेले होते, थोडे पुढे गेलो तर रस्ता पण दिसत नव्हता, अगदी 10 फुटांवर समोरील गाडी पण दिसत नव्हती, असे गाढ धुके पसरले होते.
घाटात थोडा प्रवास झाल्यावर सफेद असे फेसळणारे ऐका मागो माग एक असे धबधबे दिसायला लागले. डोळ्यांचे पारणे फिटले.
एवढे सगळे धबधबे रांगेत दिसू लागले अशी माझी पहिलीच वेळ, जणू देवाने त्यांना एका रांगेत उभे राहण्याची गोड शिक्षा दिली असावी.
आम्ही हे सगळे न्याहाळत थेट वरती पहिल्या व्ह्यू पॉइंट वर पोहोचलो, मस्त निसर्गाचा अनुभव आनंद स्वरूपात आणि आठवणी फोटो, व्हिडिओ स्वरूपात बंदिस्त केल्या आणि पुढे निघालो.
पुढे मोठा धबधबा होता, तो म्हणजे कार वॉशिंग पॉइंट, असा अजस्त्र काय धबधबा पाहून आमचे डोळे विस्फारले होते, आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. इथे थोडा वेळ घालवला, मस्तपैकी धबधब्यात भिजलो.
सकाळी 8 दरम्यान आम्ही इथे पोहोचलो होतो, अजिबात गर्दी नव्हती हे विशेष.
आता पाऊस थांबला होतो, मनात हीच ईच्छा होती, कारण त्या वातावरणाचा मनसोक्त आनंद घ्यायचा होता. दूरवर दरितील भूभाग बघायचा होता.
पुढे घाटातील महादेवाच्या मंदिरापाशी थांबलो. महादेवाचे दर्शन घेतले. आता पाऊस पूर्णपणे बंद झाला होता, वाऱ्याबरोबर ढग वाहू लागले होते, मध्येच ऊन मध्येच वारा, मध्येच सगळा प्रदेश दऱ्या खोऱ्या सूस्पष्ट दृष्टीक्षेपात यायला सुरुवात झाली होती, आनंद द्वीगुणीत झाला होता.
पुढे एक भोगदा आहे, त्यात नुकतेच रंगरंगोटी केली आहे, मराठ्यांनी रणांगणात गाजवलेल्या मोजक्या आठवणी भित्ती चित्रण स्वरूपात मांडल्या आहेत. ते बघून मन भारावून गेले.
भोगद्या नंतरचा व्ह्यू पॉइंट सर्वात सुंदर आहे, समोरील भूभाग मस्त न्याहाळता येतो. हिरव्यागार दऱ्या, धबधबे, उंच अशे डोंगर, सगळे काही स्वप्नवत, आणि गर्दी शून्य, जणू देवाने आमची सुप्त ईच्छा पुर्ण केली.
हा व्ह्यू पॉइंट बघितल्यावर आम्ही एमटीडीसी रिसॉर्ट येथील पठारावर गेलो पण इथे सर्वत्र दाट असे धुके होते, इथे आम्ही भरपूर वेळ घालवला, मज्जा आली, दुपारचे 2 वाजले होते.
परत येताना, सकाळी बघितलेले सगळे धबधबे परत एकदा न्याहाळत स्वप्नवत असा परतीचा प्रवास सुरू केला. सगळ्या आठवणींचा खजिना फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात जपून ठवला, न जाणो म्हातारपणी ह्याच उपयोगी पडतील, आणि पुढच्या पिढीला देखील त्या बघता येतील आमच्या फिरस्तिच्या गोष्टी.
आमचा स्वर्गरुपी अनुभव जर आपल्याला खरंच बघायाचा तर तो व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहे, खालील लिंक क्लिक करून आस्वाद घ्यावा
https://youtu.be/R15e764NaVo
आमच्या फिरस्तीच्या नियमित अपडेट्स मिळण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L
आपलाच
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
Borivali Hikers
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा