आजची भटकंती आहे ती दुर्ग त्रिकुटांची माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड.
नमस्कार मंडळी,
आजची भटकंती आहे ती दुर्ग त्रिकुटांची माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड.
या ट्रेकचे आयोजन श्री दीपक शेळके यांनी "दुर्ग वाटाड्या" सफर सह्याद्रीची या पुण्याच्या संस्थेने केले होते. ते पुण्यावरून नेहमी प्रमाणे त्यांची 20-22 जणांची टीम घेऊन आले होते, आम्ही त्यांना मुंबईतून 6 आणि वसईतून 4 जणांनी जॉईन केले होते.
बोरिवली वरून 3.50 ची पहिली लोकल आणि पुढे दादर वरून 4.37 ची कासाऱ्यची पहिली लोकल पकडुन आम्ही 6.30 पर्यंत आसनगाव इथे पोहोचलो.
पुढे 250 रुपये रिक्षाला ( रिक्षात 3 जण फक्त बसवतात) मोजून माहुली गडाच्या पायथ्याला असणाऱ्या माहुली गावात पोहोचलो.
पुणे आणि वसई टीम पहाटे आले असल्यामुळे ते पुढे निघून गेले होते.
आम्ही पण नाश्ता करून ट्रेक चालू केला, नाश्त्यासाठी भूमिका ढाबा 8766590580 यांना संपर्क करा. वाटेतच गडाच्या मुख्य प्रवेद्वराजवळ शाळेपुढे यांचे हॉटेल आहे.
वन विभागाची माणशी 30 रुपये अशी पावती फाडली आणि ट्रेक चालू केला.
पुढे संपूर्ण वाट मळलेली असल्याकारणाने काही चिंता नव्हती, अर्धा डोंगर गर्द झाडीने बहरलेला आहे त्यामुळे उन्हाचा त्रास पण नाही होत.
डोंगराचा खडा चढ मग पठार मग परत चढ असा थोडा लांब पल्ल्याचा दमवणारा भूभाग आहे.
शेवटी आपण मुख्य डोंगरावरून निघालेल्या एका डोंगराच्या सोंडेवर पोहोचतो आणि ती सोंड मुख्य माहुली गडाला जाऊन भिडते.
वरचा चढ हा साधारण आहे पण जर निरखून बघितले तर ही एक डोंगराची धार आहे त्यावरून आपण चालतो हे प्रामुख्याने आपण व्हिडिओमध्ये चित्रित केले आहे.
सर्वात आधी गडावर पोहोचल्यावर आपल्याला काही बुरुज आणि शिल्लक राहिलेली तटबंदी असे दिसते. गडावर ठिसूळ असा जांबा दगड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यापासून ही तटबंदी बांधली गेली आहे.
माहुलीगड तीन भागत मोडतो दक्षिणेचा भांडारगड, मुख्य असा माहुलीगड आणि उत्तरेचा पळसगड हे तिन्ही स्वतंत्र डोंगरावर स्थापित आहेत.
सर्वात आधी आम्ही भांडार गडाकडे निघालो. ह्या गडावर जाण्यासाठी आपल्याला माहुली गडावरून फार लांबचा गर्द अशा झुडपातला पल्ला गाठावा लागतो. इथे वाटेत जागोजागी थोडे भग्न वास्तूचे विखुरलेले अवशेष पहायला मिळतात. गडावर गणपती, मारुती आणि शंकराची भग्न स्वरूपातील मंदिरे आहेत. शंकराचे माहुलेश्वर मंदिर हे फक्त चौथाऱ्या पुरते मर्यादित आहे, समोरच गडावरील एकमेव असा सर्वात मोठा तलाव आहे.
माहुली गडाचा डोंगर संपून आपण एका घळीत उतरतो, पुढे भांडारगडावर जायला एका भक्कम लोखंडी शिडीचा सहारा घेतो.
आपण आता भांडारगडाच्या डोंगरावर पोहोचलो. थोडे पुढे चाल दिल्यावर आपल्याला कल्याण दरवाजा दिसतो, हा दरवाजा कल्याणच्या दिशेने आहे म्हणून याला कल्याण दरवाजा म्हणून संबोधतात. तूर्त तरी हा रस्ता टेक्निकल सपोर्ट घेऊन चढ किंवा उतरू शकतो.
थोड पुढे गेले की एक गुहा सदृश्य खांब टाक दिसते, यात पाणी पीण्याजोगे आहे.
थोड पुढे गेले की आपल्याला गडा समोरचे विहंगम दृश्य दीसायाला सुरुवात होते. हा भाग दक्षिणेकडच्या टोकाला आहे.
समोरच आपल्याला वशिंद आणि कल्याण कडचा लांबवर पसरलेला भूभाग दिसतो. याच भागातून पूर्वी सुरतेकडे जाण्यास मुख्य मार्ग होता त्यावर पण लक्ष ठेवण्यासाठी याच गडाचा उपयोग केला जाई.
इथून पुढे नवरा, नवरी भटजी, करवली आणि खास असा वजीर सुळका पण दिसतो.
हा गड फिरून आम्ही परत माहुलीगडाकडे फिरलो.
माहुली गडावर आपल्याला महादरवाजा, पाण्याचे टाके, देवड्या, शिवलिंग, वाडा, आणि एका चौथऱ्यावर स्थापित केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला मिळते.
माहुली गडाच्या उत्तर भागात पळसगड आहे, या गडावर पूर्वी भरपूर पळसाची झाडे होती म्हणून याला पळस गड म्हणून संबोधले जाते असा अंदाज इतिहासकार बांधतात.
या गडावर जाणे अत्यंत कठीण आहे, दोन डोंगरांच्या घळीतून आपण वाट काढत मार्गस्थ होतो. गडावरील भग्न असा गणेश दरवाजा फक्त उरला आहे बाकी सगळे नामशेष झाले आहे. गणेश दरवाजा हा नुकताच नजिकच्या काळात गडप्रेमेंनी शोधून काढला आहे. दरवाज्या जवळ कातळात कोरलेली गणेश मूर्ती आणि शिलालेख आहे. बाकी या गडावर काही शिल्लक नाही.
आम्ही ही गड भ्रमंती TTMM तत्त्वावर केली, एकूण खर्च बोरिवली ते बोरिवली 250 रुपये झाला.
हा गड फिरण्यासाठी दुर्ग वाटाड्या संस्थेने गाईड उपलब्ध केला होता त्याचा खर्च त्यांनीच केला होता त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
माहुली गडावर माझे आधी पण जाणे झाले होते पण फक्त महादरवाजा जवळचा भाग बघितला आणि माघारी फिरलो होतो. पण या वेळी ही दुर्ग भ्रमंती त्रीकुटांची होती हे विशेष म्हणून मी पण या गड भ्रमंतीमध्ये सहभागी झालो.
या फिरस्तीमध्ये गडाचा डेरा एव्हढा मोठा होता की कुठेही दम खायला वेळ मिळाला नाही.
श्री दीपक शेळके पुणे, श्री फ्रँक अल्फान्सो, श्री नितीन कामात, वसई येथून आले होते, यांची भेट पण हस्तांदोलनापूर्ती मर्यादित राहिली.
थोडा इतिहास:
ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजेंच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला. माहुली किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखान याने माहुलीचा किल्लेदार द्वाराकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले. त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वाराकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की साल्हेरचा किल्लेदार असोजी प्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन आणि ४० हजार रुपये, १० घोडे, खिलत इनाम आणि राहण्यासाठी जुन्नर जवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन. माहुलीचा किल्लेदार द्वाराकोजी अब्दुल कादिराला भेटला ती तारीख होती २१ ऑगस्ट १६८८.
पेशवाईच्या काळात किल्लाच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे होते. त्यांचे अवशेष आजही आहेत. मंदिरासाठी वर्षासने दिली होती. परंतु पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिश काळात आणि स्वातन्त्रायानंतर मंदिराकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन उदासीनच होता.
जर आपल्याला आमच्या TTMM ट्रेक ग्रुप मध्ये सामील व्हायचे असेल तर खालील लिंक क्लिक कारा.
https://chat.whatsapp.com/JUPpnS6ZYmg5KsPvxC3ltw
हा व्हिडिओ Insta 360 या कॅमेऱ्याने शूट केला आहे, त्याची व्हिडिओ ग्राफि GoPro कॅमेरा पेक्षा वेगळी असते, या व्हिडीओची लिंक पुढील प्रमणे देत आहे, जरूर बघून घ्या.
भाग 1
https://youtu.be/gKGvg2qB9Bw
भाग 2
https://youtu.be/M3H4ywLXYgg
गडावर फिरण्यासाठी गाईड ची गरज नाही, जगो जागी बोर्ड आहेत, पण पळसगडावर जायचे झाल्यास गाईड लागेल. तो हवा असल्यास आपण खालील नंबर वर संपर्क करू शकता.
श्री कृष्णा मामा आगिवले
+917875322744
आसनगाव येथे भल्या पहाटे रिक्षा उपलब्ध नसते तेव्हा रिक्षा साठी संपर्क क्रमांक खालील प्रमाणे.
अतुल कपटे +917620515036
चला तर मग परत भेटू अनोख्या भ्रमंती मध्ये.
आपलाच,
सिद्धेश पाटील,
WhatsApp no 9967152938
Simple Lifestyle Vlogs
Borivali Hikers
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा