माथेरान घाट वाटा भाग१ आंबेवाडी-उंबरणेवाडी-शिडीची वाट-गुहेतील महादेव पिंडी-पिसरनाथ महादेव मंदिर


🚩🚩 सादर जय शिवराय🚩🚩

नमस्कार मित्रांनो,

आपण नेहमी प्रमाणे TTMM दृष्टिकोनातून ही मोहीम आखली होती, आम्हाला सात जणांचा आकडा गाठायचा होता कारण ऐका टॅक्सीमध्ये सात जण बसतात, त्या दृष्टिकोनातून इतर ट्रेकिंग ग्रूप मधे विचारणा केली, भरपूर जणांनी प्रतिसाद आणि सहमती दर्शवली. आपण WhatsApp ग्रुप तयार केला, सल्ला मसलत करण्यासाठी, काही जण काही कारणास्तव जमणार नाही बोलून आधीच बाहेर पडले त्यांचे मनस्वी आभार, तरीपण ग्रूपमध्ये अंदाजे ९ जण होते. पण सगळ्यात शेवटी आयत्या वेळेला शनिवारी संध्याकाळी ३ जण सोडून बाकी कोणी प्रतिसाद द्यायला तयार नव्हते किती हा बेजवाबदारपणा. फार राग आला होता आम्हां तिघांना, फार बिकट परिस्थिती होती सरते शेवटी रात्री ९ वाजता तिघांनी ठरवले की ही मोहीम रद्द करावी तसे ग्रुप वर कळवले देखील. पण लागलीच का होईना रात्री ९ च्याच दरम्यान मला श्रीयुत संतोष देशमुख यांचा फोन आला ते बोलले आम्ही ५ जण पुण्यावरून येत आहोत. लगेच मयुरशी बोलणे केले तो तयारच होता आम्ही दुचाकीचा पर्याय निवडला कारण कर्जत वरून खाजगी वाहनाने जाऊन आणि परतीच्या प्रवासाचे असे अंदाजे १५०० रुपये लागणार होते हाच कळीचा मुद्दा होता आणि तेच दोन तीन जणांसाठी परवडणारे नव्हते. अगदी ५ माणसे असती तरी आम्ही TTMM साठी तयार होतो असो, पण आयत्या वेळेवर बेजबाबदार लोकांनी फसविले, फार वाईट वाटले अशी माणसे आयुष्यात कुणालाही न भेटो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

श्रीयुत संतोष देशमुख यांचे फेसबूक वरील फिरस्तीचे पोस्ट आणि फोटो काही महिन्यापूर्वी बघितले होते, ते अफलातून ट्रेक करतात, त्यांच्याबरोबर ट्रेक करावा ही इच्छा देखील होती, असे काही महिन्यांपूर्वी बोलणे देखील झाले होते आणि योग पण जुळून आला पण वेळे अभावी एकाच ट्रेक वर असून पण भेट झाली नाही, असो परत कधीतरी ही ग्रेट भेट नक्की होणार एखाद्या चांगल्याच भन्नाट ट्रेक वर अशी इच्छा बाळगतो.

ठरल्याप्रमाणे मी आणि मयुर सकाळी ७.३०ला पनवेल स्टेशनला भेटलो तेव्हा १५ अंश तापमान होते, थंडीचा कहर होता त्यात मयुरने दुचाकी चालवली तो एक चमत्कार कारण कितीही केले तरी मी मागे सुरक्षित बसलो होतो, तो पुढे थंडी आणि वाऱ्याचा मार झेलत होता. आम्ही पनवेल वरून कर्जतच्या दिशेने प्रवास चालू केला, बोरगाव फट्यावरून डाव्या बाजूचा रस्ता धरला आणि पुढील ८ km वरील आंबेवाडीकडे निघालो.

गावात जायचा रस्ता छोटा असला तरी चांगला आहे. वाटेत जाताना पावलो पावली मोरबे धरणाच्या भव्यतेची प्रचिती येत होती. धरणाचा अथांग असा जलसाठा समोर बघून डोळे विस्फारून जातात. थोडे पुढे जातोच तसा वाटेत बहरलेल्या पळसाचा मनमोहक लाल भडक रंग डोळे दिपून टाकतो अशी भरपूर झाडे एका मागून एक जणू काही आपले स्वागतच करण्यासाठी गावच्या वेशीवर उभी असावीत. समोरच पुढे माथेरानचा डोंगर मनाला साद घालत उभा खेटतो जसा काही तो तुम्हाला आव्हानच करत आहे की माझ्या सारखा मीच, माझी विशालता, माझा कणखरपणा तुम्ही लांबून नाही माझ्या अंगा खांद्यावर खेळून बघा. "मान रोखुनी खडा माझ्या सह्याद्रीचा कडा" हे शब्द कानात गुणगुणू लागतात. माथेरानच्या दक्षिण बाजूचा डोंगर कडा मोठा चौक पॉइंट छाती ताणून उभा ठेकलेला, मनाला धस्स करणारा होता आणि हेच त्याचे आव्हान पेलेल की नाही ह्याच शंकेची पाल मनात चूक चुकली पण हे ह्या ठिकाणी असा बोलणे किंवा विचार करणे म्हणजे युद्धाच्या आधीच हत्यार ठेवण्यासारखे झाले असते, ते मनोबल खाच्ची करण्यासरखे झाले असते म्हणून काहीही न बोलता गप गुमान प्रवास चालू ठेवला.

आम्ही साधारण ८.३० च्या सुमारास आंबेवाडीला पोहोचलो. वातावरण अगदी गुलाबी थंडीत आणि कवळ्या सोनेरी ऊनात न्हाऊन निघाले होते. मन प्रसन्न करणारे वातावरण होते. गाव एकदम स्वच्छ होतं, कुठेही शोधूनही कचरा दिसणार नाही असे. गावात शिरताच समोर छोटेखानी शाळा आहे तिथे गाडी थांबवीण्याकरता भरपूर जागा उपलब्ध आहे.

सकाळचा बाजार भरला होता, भरपूर गावकरी मंडळी जमा झाली होती. सगळ्यांशी सल्ला मसलत केली त्यात काही ट्रेक गाईड पण होते. त्यांनी सल्ला दिला की ट्रेक उंबरणेवाडीतून प्रवास चालू करा कारण तो चढ कठीण आहे म्हणूनच दुपारचे ऊन डोक्यावर यायच्या आत आटोपून घ्या.

श्रीयुत संतोष देशमुख आणि मंडळी यायला तब्बल एक तास उशीर होणार होता म्हणून आम्ही ठरवले की हळूहळू चाल द्यावी आणि ट्रेक चालू केला.

आम्ही पुढे गावाच्या बाहेरून जाणाऱ्या उंबरणेवाडी रस्त्याकडे कडे कूच केली. आम्ही पुढे निघालो असल्यामुळे आम्हालाच रस्ता शोधायचा होता, पायवाट सरळ होती पण त्याला असंख्य उपवाटा तयार झाल्या होत्या काही गुर चारण्यासाठी तर काही लाकडे गोळा करण्यासाठी. गावकऱ्यांसाठी जंगल म्हणजे कायमचाच पोशिंदा हे गृहितच धरून चालावे आणि हो त्यासाठी पण नशीबच लागते. नाहीतर अशी जंगल आता बघायाला राहिली नाहीत, ही एक जळजळीत खंत.

थोडे चालल्यानंतर वाटेतच ऐका प्राण्याची विष्ठा दिसली ती एकदम ताजी होती, तिचे थोडे विश्लेषण केले, बहुदा ती एका मांसाहारी प्राण्याची असावी तसे प्रथमक्षणी जाणवत होती आणि तो प्राणी अवती भवती जवळच असावा असे मला वाटले म्हणून चालताना जरा दक्षतेसाठी आपले primary safety equipment हाताशी तयार ठेवले.

पुढे दाट जंगल चालू झाले आणि विविध प्रकारच्या प्राण्यांचे पक्षांचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू लागले. लागलीच पुढे कुणीतरी दिशादर्शक चिंध्या बांधल्या होत्या. जसे पुढे गेलो तसे दोन चिंध्या मधील अंतर कमी होत गेले, साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर चिंध्या आणि पायवाट गायब झाली. मला वाटले आम्ही रस्ता भरकटलो तरीही मला आत्मविश्वास आणि खात्री होती की आम्ही त्याच दिशेने चाललो होतो कारण ऑफलाईन गूगल मॅप satellite mode वर तसे दिसत होते. दाट जंगलात चालतांना दिशेचे भान ठेवणे हे फार महत्वाचे असते त्यामुळे मला नेहमी फायदा झाला आहे आणि महत्वाचे बहुदा मी दिशा आणि रस्ता कधीही विसरत नाही हे कौशल्य आपल्या पूर्वजांकडून माझ्या पर्यंत आले असावे असे मला वाटते.

आम्ही रस्ता शोधायला सुरवात केली पण सरळ पुढे १५-२० फूट खोल असा पावसाळी ओहळ सुकलेल्या अवस्थेत होता. पण खाली उतरून त्याला पार करण्यासाठी उचित जागा भेटत नव्हती. शोध कायम चालू ठेवला शेवटी आम्ही खाली उतरण्याचा मार्ग शोधला. मागून श्रीयुत संतोष देशमुख येत होते, त्यांना थोडे फोनवर गाईड केले, दगडावर खडूने खुणा केल्या आणि पुढे मार्गस्थ झालो. सूका ओहळ पार केला पण पुढे पायवाट नव्हती. वाढलेलि करवंदाची झाडे कापली आणि वाट तयार केली. थोडे चाललो आणि मळलेली पायवाट दिसली, मनात आनंदाचा डोह उचंबळू लागला, सरते शेवटी बरोबर मार्ग मिळाला.

चढ सुरुवतीपासूनच भारी आहे आणि जसे वर जातो तसा तो अधिकच वाढतो. भरपूर चाललो नाही चढलो कारण हा खडा पहाड आहे पण दाट जंगल आहे सावली असल्यामुळे काही त्रास झाला नाही. पुढे ओके बोके झालेला डोंगर लागले, तरीही पहिली शिडी भेटत नव्हती मनात धास्ती होती की वाट बरोबर धरली की काही चूक झाली कारण हा रस्ता फार कमी जण वापरतात, आत्तापर्यंत एकही माणूस दिसला नव्हता जो कुणी मार्गदर्शन करेल असा.

थोड्याच वेळात दगडात Y आकाराचे वाळलेल्या लाकडाचा ओंडका दगडात कठीण जागी चढण्यासाठी लावलेला होता तो दिसला, मनाला शांती मिळाली, कारण खालून वरती बघितले तर उंच डोंगराचा फक्त कडा दिसत होता पायवाट गुडूप झालेली होती म्हणून प्रश्न आणि उत्सुकता दोन्ही मनात दाटली होती की कसे वर जाता येईल आणि आपण बरोबर वाटेवर आहोत की नाही. दोन तासांनी का होईना पण रस्त्याच्या खणा खुणा दिसल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला होता. आम्ही बरोबर मार्गावर आहोत ह्याची खातर जमा झाली. लगेच थोडे चालल्यानंतर पहिली शिडी लागली ती पार करून उजव्या हाताला वळलो ही डोंगराची कपार आहे, त्याच कपारिमध्ये छोटी गुहा सदृश्य जागा आहे तिथे शंकर महादेवाची पिंडी आहे, हीच ती पिसरनाथांची गुहा. इथे महादेवाच्या पिंडीवर ३६५ दिवस कातळातून झिरापलेल्या पाण्याचा अभिषेक चालू असतो. ही जागा विलक्षण आहे ह्या जागेत सकारात्मक कंपन जाणवते, कमाल शांतता, बाजूला भले मोठाले डोंगर कडे, खाली खोल दरी तिही दाट जंगलाने भरलेली समोर उंबरणे गावाचा परिसर त्या पुढे क्षितिजावर प्रबळ गडाचा कातळ कडा दिसतो, इथे ध्यान लावण्यासाठी उत्तम जागा आहे.

गावच्या लोकांमध्ये पिसरनाथ मंदिराची कथा प्रचलित आहे की माथेरानच्या मंदिरात एक साधू बाबा ध्यान करण्यासाठी बसत असतं त्यांची प्रचिती फार होती, पण त्यांची महती फार असल्यामुळे इथे लोकांचा फार मोठा राबता चालू असे त्यामुळे त्यांच्या ध्यान साधनेमध्ये व्यत्यय येत होते म्हणून त्यांनी हे मंदिर सोडले आणि खालील गुहेमध्ये ध्यान साधनेसाठी बसू लागले त्यामुळे त्यांचा ध्यानन मनन सफल झाले अशी आख्यायिका आहे.

इथे टेन्ट लावला तर उत्तम, पण नाही लावू शकतं कारण सलग उतार आहे इथे झोपता येणार नाही आणि माकडांचा त्रास आहे तो वेगळाच ह्याची नोंद घ्यावी.

पावसाळ्यात हा ट्रेक करणे धोकादायक असू शकते कारण डोंगरावरून भरपूर पाणी खाली येणार ते वर चढू देणार नाही आणि वाट फार निसरडी होणार ह्याची नोंद घ्यावी.

पुढची वाट धरली तेव्हा दोन डोंगरांच्या मधला V पॅच म्हणजे घळ लागली, इथे पुन्हा २ शिड्या आहेत, शिड्या कमकुवत आहेत तेव्हा एक एक करून चढावे किंवा उतरावे. शिडी संपल्यावर परत वेगळाच प्रस्तर प्रकारचा दगड लागतो तो थोडा ठिसूळ आहे तेव्हा पाय जरा जपून टाका नाहीतर खाली असणाऱ्या माणसाच्या डोक्यात दगड पडतील ही दक्षता घ्या. इथे एक स्टील ची तार आहे त्याला पकडून आपण वर चढून जाऊ शकता.

वर येताच क्षणी मोरबे धरण परिसराच्या अथांगतेची प्रचिती येते. इथे वेळ न दवडता आम्ही पिसरनाथ मंदिराची वाट धरली. अगदी ५ मिनिटाच्या जंगल वॉक नंतर मंदिराच्या घंटेचा नाद कानी पडू लागला.

स्वयंभू पिसरनाथ मंदिराचे रूप डोळ्याचे पारणे फेडते ही वास्तू वेगळीच आहे या वास्तूची घडण बघून हे मंदिर आहे असे वाटतच नाही. ह्या मंदिरामध्ये शंकराची पिंडी नाही पण पिंडी सदृश्य दगडाची मूर्ती आहे त्यांची पूजा केली जाते. हे मंदिर चिराच्या दगडापासून बनवले आहे या मंदिरची तावदाने पारदर्शक काचेची असून त्याला सागवानी लाकडाची फ्रेम आहे त्यामुळे असा भास होतो की ही वास्तू ब्रिटिशकालीन असावी आणि त्याचं नंतर मंदिरामध्ये रूपांतर झाले असावे किंवा कोणी दानशूर व्यक्तीने मंदिर घडविण्यासाठी भरपूर पैसे दान केले असावेत आणि त्या पैशातून या वास्तूची बांधणी झाली असावी. मंदिर गर्द झाडीमध्ये आहे तरीही दिवसा काचेच्या तावदानामुळे आतमध्ये लख्ख प्रकाश येतो. त्या जुन्या काळामध्ये माथेरान ही इंग्रजांच्या विसाव्याची जागा होती उन्हाळ्यामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून इंग्रजांनी ह्या जागेचा फार वापर आणि विकस केला होता म्हणून इंग्रजांच्या स्थापत्य शास्त्राची छाप या मंदिरावरती चांगलीच दिसून येते.

क्रमशः भाग दुसरा लवकरच प्रसारित होईल स्वयंभू पिसरनाथ महादेव मंदिर माथेरान-परतीचा प्रवास वन ट्री हिल पॉईंट उतरून परत आंबेवाडी

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.

YouTube Episode Link: https://youtu.be/Vc_HIYdy9M8

YouTube Channel:
https://youtube.com/@SimpleLifestyleVlogs

Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp number: ९९६७१५२९३८

जर आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता तर मग वरील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube वर उपलब्ध आहेत.

जर आपल्याला TTMM म्हणजे काय हे माहिती करून घायचे असेल तर खालील व्हिडिओ लिंक क्लिक करा आणि समजून घ्या

Simple Lifestyle Vlogs TTMM concept episode https://youtu.be/uiUPdLNxjBY

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,

सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली